नाट्यकर्मी अतुल पेठे
प्रिय शेखर,
नमस्कार, सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन. काल मी ‘व्हॅन गॉग अभिवाचन’ ऐकले आणि पाहिले. श्रवण आणि दृष्टी सुखाचा आनंद मिळाला. व्हॅन गॉग आपल्या सर्वांना मुख्यत्वे परिचित झाला तो माधुरी पुरंदरे यांच्या उत्कृष्ट अनुवादातून. त्याचे अर्थपूर्ण संकलन, दिग्दर्शन तुम्ही केलेत. त्यात गॉगची चित्रे मोठ्या पडद्यावर वाचनाला अनुरूप अशी प्रक्षेपित केलीत. व्हॅन गॉग किती विलक्षण प्रतिभेचा कलाकार आणि माणूस होता ते परत माझ्या दृष्टीला आकळले. तीव्र संवेदनशील अस्सल कलावंत कलेतून व्यक्त होताना काय सोसतो हे पाहून अंतर्मुख झालो. व्हॅन गॉगची सृष्टी पाहताना मी काल नव्याने अचंबित झालो. तुमचे सर्व कष्ट, मेहनत आणि लगन कालच्या प्रयोगातून जाणवत होती. तुमच्या प्रयोगामागचे गांभीर्य मनात रुजले.
धीरेश जोशी, अश्विनी गिरी, धनेश जोशी, सई लिमये या कलाकारांनी ते तोलून धरले. सर्वांचा वाचिक अभिनय हा वस्तुपाठ होता. सर्वांनी त्यांच्या व्यक्तिरेखा आवाजातून आमच्या पर्यन्त पोहोचवल्या. व्हॅन गॉगची तडफड, व्याकुळता, असहाय्यता आणि निराशा या सर्वांनी समर्थपणे पोहोचवली. कला आणि कलाकार यांच्याबाबत अनेकदा गैरसमज आणि अज्ञानच असते. त्यातही तो कलाकार नेहमीच्या रुळलेल्या पायवाटा न स्विकारता अनघड रस्ते शोधत असेल तर खूप यातनामय अनुभवांना तो सामोरा जात असतो. व्हॅन गॉग तसा होता. त्यांनी मरणाची जोखीम पत्करली. ती तगमग या प्रयोगातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचली.
आशा करतो की इथल्या सर्व क्षेत्रातील कलाकार हा प्रयोग पाहातील आणि आम जनताही त्यात सहभागी होईल.
मी व्यक्तिशः मला समृध्द केल्याबद्दल आभार मानत आहे. व्हॅन गॉगची कथा ऐकून पाहून पाय जमिनीवर अधिक घट्ट झाले.
चित्रकार जयंत भीमसेन जोशी
“माझं पेंटिंग हा माझा धर्म आहे, मी असाच पुढे जाणार आणि जगणार, त्यापुढे जनमताची काय पत्रास…” असं व्हिन्सेंट व्हॅन गॉघ म्हणायचा. कलेमधे त्याला निश्चित काही नवे, वेगळे, तत्कालीन रुढींना छेद देणारे दिसलं होतं आणि तिथे पोहोचण्याच्या नादात त्याचे लौकिक जिणे असंबद्ध होऊन गेले. कलेच्या इतिहासातली ही मोठी शोकांतिका ! परंतु त्यानी जी काही असामान्य कलासंपदा निर्माण केली ती आजही अनेक कलावंतांना प्रेरणादायक आणि कलाप्रेमींसाठी आनंदऊर्जेचा स्रोत आहे. व्हिन्सेंट व्हॅन गॉघच्या स्मृतिदिनाबद्दल, शेखर नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला काल संध्याकाळचा भरत नाट्य मंदिरातला अभिवाचनाचा प्रयोग फार परिणामकारक झाला. व्हिन्सेंट व्हॅन गॉघच्या शेखर नाईक यांच्या दृष्टिकोनातून बघितलेल्या या जीवनकहाणीचे सादरीकरण ऐकून मन स्तब्ध झालं. या निमित्तानी नव्या पिढीला व्हॅन गॉघच्या पेंटिंग्जबद्दल, त्याच्या ध्यासाबद्दल अधिक पाहण्याची, वाचण्याची ओढ लागावी असे वाटते. शेखर नाईक आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन. धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा.
माधवी वैद्य
आज संध्याकाळी एक सर्वांग सुंदर अभिवाचनाचा प्रयोग बघितला. प्रयोगातील सर्व सहभागी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन !सशक्त संहिता,सार्थ दिग्दर्शन ,दमदार अभिवाचन,सुंदर संगीत,प्रकाश योजना,व्हिन्सेंटच्या अप्रतिम पेंटिंग्जची सुरेख दृक योजना यामुळे प्रयोग फार उंचीचा झाला.आणि “अनन्वय “चे अश्विनी,धीरेश आणि धनेश या तीन कलाकारांचा सहभाग …माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आणि आनंददायी !
जुई कुलकर्णी
व्हिन्सेंट व्हॅन गाॅग: अभिवाचन
व्हिन्सेंट व्हॅन गाॅग हा नेहमीच जीवाजवळचा विषय राहिला आहे.त्याच्या जीवनावर आधारित कादंबरी आयर्व्हिंग स्टोन यांनी लिहली त्याचे मराठी रूपांतर माधुरी पुरंदरे यांनी केले.सगळ्या चित्ररसिकांच्या आयुष्यात हे पुस्तक येते आणि त्या वयाच्या कोवळेपणानुसार तुम्हाला हलवून टाकते. या कादंबरीचे अभिवाचन शेखर नाईक यांच्या दिग्दर्शनाखाली चार कलाकार करतात.काल हा प्रयोग पाहण्याचा योग आला.मूळात ही कादंबरी फारच उत्कृष्ट आहे.व्हिन्सेंटच्या लहानशा आयुष्याचे तसे चार भाग पडतात. पहिला भाग तो नोकरी करणारा साधा मुलगा आहे जो उर्सूलामुळे झालेल्या प्रेमभंगानं खचतो. दुसरा भाग बेल्जियम मधल्या कोळसा खाणीच्या गावात त्याला दिसणारे भीषण जीवन.तिसरा भाग व्हिन्सेंट चित्रकार होण्याचे ठरवतो आणि थिओ त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देतो.त्याचे कष्ट आणि हलाखी. चौथा भाग व्हिन्सेंटचे आर्ल मधील जगणे.तेथील काम,पाॅल गोगॅसोबतचा काळ,मानसिक आजारपण आणि करूण अंत.
हे चारही विषय या दोन अंकी अभिवाचनात नीट उभे राहिले आहेत. स्पष्ट वाचनासाठी धीरेश जोशी आणि ठसकेबाज पण भावपूर्ण वाचनासाठी अश्विनी गिरी विशेष उल्लेखनीय आहेत. व्हिन्सेंटची चित्रं मागे दिसत राहतात हे आवडले.चित्रकाराची संवेदनशीलता अभिवाचनात पकडली जाणं महत्वाचं होतं ते घडलं आहे.
प्रकाश,नेपथ्य ,संगीतही पुरक आहे. व्हिन्सेंटच्या या पुनर्भेटीनं चित्ररसिक विचारप्रवृत्त होतात हे नक्की.